गावाची सर्वसाधारण माहिती
दोडी बु हे नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील एक महत्त्वाचे व सर्वांगीण विकास साधलेले गाव आहे. गावाची एकूण लोकसंख्या सुमारे ५२८६ इतकी आहे, त्यात पुरुष – २७१५ आणि स्त्रिया – २५७१ आहेत. गावाचे एकूण क्षेत्रफळ २६९८ हेक्टर असून त्यामध्ये कोरडवाहू, बागायती, वनजमीन व गावठाणाचा समावेश आहे. गावात ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक शाळा, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, महाविद्यालय, बँक, पोस्ट ऑफिस, दूधसंस्था, पतसंस्था, तसेच विविध स्वयंसेवी संस्था व पाणी वापर संस्था कार्यरत आहेत.
गावामध्ये ८ अंगणवाड्या, १० प्राथमिक शाळा, १ माध्यमिक शाळा, १ कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय आहे. येथे आरओ वॉटर फिल्टर, सांडपाणी शोषखडे, गटारी, घनकचरा व्यवस्थापन, तसेच सीसीटीव्ही, ई-लर्निंग सुद्धा प्राथमिक शाळांमध्ये उपलब्ध आहेत. शेती हा गावाचा मुख्य व्यवसाय असून येथे कांदे, टोमॅटो, गहू, बाजरी, मका, सोयाबीन अशी विविध पिके घेतली जातात. डाळिंब व अॅपल बोर या फळबागाही मोठ्या प्रमाणात आहेत.
दोडी बु हे गाव धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून सुद्धा समृद्ध आहे. येथे श्री म्हाळोबा मंदिर, विठ्ठल मंदिर, श्री ब्रह्मानंद स्वामी समाधी मंदिर हे महत्त्वाचे धार्मिक स्थळे आहेत. म्हाळोबा यात्रा, पालखी सोहळा, निवृत्तीनाथ महाराज दिंडी मुक्काम यांसारखे धार्मिक उत्सवही गावात साजरे होतात.
गावात विविध लोकवर्गणीतून उभारलेली विकासकामे, पाणी वापर संस्थांचा यशस्वी उपक्रम, तसेच नवीन व्यापारी संकुल यामुळे गावाचा सर्वांगीण विकास होत आहे. दोडी बु हे एक आदर्श गाव म्हणून ओळखले जाते.